लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीवमधून तिन्ही पॅनलचे उमेदवार वाळवा तालुक्यातील आहेत. हे तिघेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समथर्क मानले जातात. आता या तिघांमधून कोण बाजी मारणार, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील धनगर बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.
सहकार पॅनलचे अविनाश खरात आणि संस्थापक पॅनलचे नितीन खरात हे खरातवाडी (ता. वाळवा) येथील ऊस उत्पादक सभासद आहेत. या दोघांचा ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत राजकीय प्रवास आहे. अविनाश खरात हे माजी सरपंच असून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. कृष्णेच्या गत निवडणुकीत रयत पॅनलकडून त्यांची उमेदवारी होती. यावेळी मात्र त्यांच्याच समाजातील मातब्बर नेत्यांच्या शिफारशीने अविनाश खरात यांना सहकार पॅनलकडून उमेदवारी मिळाली आहे, तर संस्थापक पॅनलनेही सहकारवर कडी करत कृष्णेचे माजी संचालक नितीन खरात यांना उमेदवारी देऊन अविनाश खरात यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोघेही जयंत पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली खरातवाडी येथे आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहेत.
सहकार आणि संस्थापक पॅनलला शह देण्यासाठी आणि तोडीस तोड म्हणून रयत पॅनलने याच समाजातील इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी दिल्याने आता राखीवमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मलगुंडे हे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. धनगर समाजात त्यांचा संपर्क आहे. इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात मलगुंडे यांचा दबादबा आहे. ते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पालिकेच्या राजकारणात नागरिक संघटना आणि शहर सुधारणा या दोन संघटना होत्या. मलगुंडे हे शहर सुधारणाकडून नगरसेवक होते.
नगराध्यक्ष निवडीवेळी अटीतटीच्या संघर्षात नागरिक संघटनेचे एक मत फोडून मलगुंडे नगराध्यक्ष झाले. प्रारंभीपासून कृष्णेच्या राजकारणात मलगुंडे यांनी यशवंतराव मोहिते, मदन मोहिते यांना साथ दिली आहे. यावेळच्या निवडणुकीत मदन मोहिते सहकार पॅनलमध्ये आहेत, तर मुलगंडे यांंनी मोहिते घराण्यावरील निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळेच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी देऊन कृष्णेच्या निवडणुकीत रयतेच्या झेंड्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकट
नेत्यांची भूमिका तटस्थ
तिन्हीही उमेदवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्षा अॅड. चिमण डांगे यांचे नेतृत्व मानतात. त्यांना राजकारणात मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच नेत्यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवून कृष्णेच्या राजकारणात समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.