सांगली : महापूरच्या काळात सांगली, सांगलीवाडी परिसरातील नागरिकांना वेळीच मदत करण्यासाठी जयंत रेस्क्यु फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन रविवार, २० रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी दिली.
सांगलीवाडीतील शंकर घाट येथे हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, सुरेश पाटील, शेखर माने, पद्माकर जगदाळे, संभाजी कचरे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, अभिजित कोळी, पद्माळेचे सरपंच सचिन जगदाळे उपस्थित राहणार आहेत.
पाटील म्हणाले की, २०१९ मध्ये सांगली व सांगलीवाडीला महापुराचा मोठा फटका बसला होता. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले होते. अनेक जण पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. या पार्श्वभूमीवर पूरबाधित नागरिकांनी वेळीच मदत पोहोचविण्यासाठी जयंत रेस्क्यु फोर्सची उभारणी केली आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.