सांगली : मध्यरात्रीनंतरचा एक वाजून गेला होता. जोरदार आक्रमक चढाया अन् काैशल्याने होणाऱ्या पकडी, चपळाईचा बोनस, अशी अटीतटीची लढत पाहून शौकिनांची उत्कंठा वाढली होती. शेवटच्या पाच मिनिटांत चुरस वाढल्याने श्वास रोखून धरत काय होणार? या थराराकडे हजारोंचे डोळे रोखले होते. अखेर सुरुवातीपासूनची गुणांची आघाडी कायम ठेवलेल्या जयंत स्पोर्ट्सने गतविजेत्या जय मातृभूमी संघाला त्यांच्याच ‘होम पिच’ पराभूत करत कबड्डीच्या विजेतेपदाच्या चषकावर नाव कोरले.७२ व्या जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या जय मातृभूमी संघाच्या घरच्या मैदानावर यंदाही अंतिम फेरीत धडक मारली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांची गॅलरी खचाखच भरली होती. अंतिम सामन्यात इस्लामपूरच्या जयंत स्पोर्ट्सबरोबर मध्यरात्री लढत सुरू झाली. जयंत स्पोर्ट्सच्या अभिषेक घुगे, शुभम पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुरुवातीपासून गुणांची आघाडी ठेवली, तर जय मातृभूमीच्या सुरेंद्र कडलगे, तुषार खडके, प्रशांत कांबळे, ओंकार एंजल आदींनी घरच्या मैदानाचा फायदा उठवत तितकाच बहारदार खेळ केला. मध्यंतरापर्यंत जयंत स्पोर्ट्सने २३-१३ अशी आघाडी कायम ठेवली. अटीतटीची लढत पाहून प्रेक्षक जागेवरच खिळले होते. शेवटपर्यंत दोन्ही संघांनी थरार कायम ठेवला. पाच मिनिटे बाकी असता जयंत स्पोर्ट्स ४२-३३ नऊ गुणांनी आघाडीवर होता, तेव्हा सुरेंद्र कडलगे आणि इतरांनी चांगला खेळ करत लोण चढवला. चार गुणांची आघाडी कमी करण्यासाठी झटपट खेळ सुरू केला. परंतु, तेव्हाच जयंत स्पोर्ट्सच्या शुभमची पकड करताना चूक भोवली. त्याने पकडीतून निसटताना तीन गुण मिळवत प्रमुख चढाईपटूंना बाहेर ठेवले. येथेच सामना फिरला गेला. पाच गुणांची आघाडी कायम ठेवत ४७-४२ असा गुण फलक कायम राहिला अन् जयंत स्पोर्ट्सने चषक पटकावला.तत्पूर्वी इस्लामपूरच्याच इस्लामपूर व्यायाम मंडळ विरुद्ध जयंत स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य सामना झाला. इस्लामपूर मंडळ अनुभवाच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारणार असे चित्र असतानाच शुभम पाटील, अभिषेक घुगे यांनी एकहाती सामना फिरवला. ५६-४२ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जय मातृभूमी संघाने तरुण मराठा सांगलीवाडीचा ३९-२७ गुणांनी पराभव केला.
महिलांच्या गटात उपांत्य फेरीत आरगच्या प्राेग्रेस संघाने सिद्धेश्वर माधवनगरचा २८-०६ असा एकतर्फी पराभव केला. तर, शिवाजी वाळवा संघाने राजाराम स्पोर्ट्स माधवनगरचा ३७-१६ असा एकतर्फी पराभव केला. प्रोग्रेस विरुद्ध शिवाजी यांच्यात शेवटच्या टप्प्यात प्रचंड चुरस झाली. दोन्ही संघांचे गुण समान असतानाच शिवाजी वाळवा संघाने अनुभवाच्या जोरावर पकडी व चढाई करत ४२-३६ अशा गुणांनी विजेतेपद पटकावले.जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देण्यात आला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणेश शेट्टी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नेटक्या संयोजनाने रंगतस्पर्धेचे नेटके संयोजन करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धेचा आस्वाद घेता आला. स्पर्धा निरीक्षक मधुकर साळुंखे, तांत्रिक कमिटी प्रमुख अनिल माने, पंचप्रमुख आलम मुजावर आणि मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.