कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील ओढ्यालगतच्या मातंग समाज, बौद्ध समाज, तसेच नागोबा गल्ली, कुंभार गल्ली, डबाणे गल्लीतील कुटुंबांना भेटून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक त्यांच्यासमवेत होते.
पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्वकाही ठीक होईल, असा धीर त्यांनी पूरग्रस्तांना दिला. यावेळी अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिली.
देवराज पाटील म्हणाले, गावातील विविध समाजाच्या शंभरावर घरात ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी सभापती शुभांगी पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच किरण पाटील, उदय पाटील, उपसभापती सुरेश गावडे, उपसरपंच दाजी गावडे, विलासराव पाटील, सचिन पाटील, अभिजित तोडकर, कृष्णा कांबळे, फिरोज अत्तार, ग्रामविकास अधिकारी राहुल सातपुते, तलाठी तानाजी पवार उपस्थित होते.
फोटो : येणार आहे.
ओळी : कासेगाव (ता. वाळवा) येथे ओढ्याच्या पुराचा फटका बसलेल्या परिसराची पाहणी जयंत पाटील यांनी केली. यावेळी देवराज पाटील, विराज नाईक, रवींद्र सबनीस, शशिकांत शिंदे, किरण पाटील उपस्थित होते.