लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशवासीयांना यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीपासून दूर राहावे लागले आहे. याच गोष्टीची खंत व्यक्त करताना जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना अनोखे पत्र लिहून अभिवादन केले. पोस्टकार्ड लिहिण्याच्या कालबाह्य होत असलेल्या परंपरेला उजाळा देत त्यांनी बाबासाहेबांप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.
जयंत पाटील यांनी पोस्टकार्डवर स्वहस्ताक्षरात बाबासाहेबांच्या नावे पत्र लिहिले. ‘लेटर टू बाबासाहेब’ ही मोहीम सुरू करून त्यांनी त्यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन टि्वटरद्वारे केले. यात त्यांनी लिहिले आहे की, ‘‘प्रिय बाबासाहेब, देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करीत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचे आजही आम्ही पालन करीत आहोत. म्हणून देशहितासाठी आपल्याला महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यरत आहे. इथल्या रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांवर कितीही हल्ले झाले तरी, त्यांना तडा न जाऊ देता, समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू. चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचाच ऊर्जास्रोत आहे. इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील, याचा मला विश्वास आहे.’’
वळणदार अक्षरे...
जयंत पाटील यांचे हस्ताक्षरही यानिमित्ताने सोशल मीडियावर चर्चेत आले. वळणदार अक्षरांमुळे अनेक समर्थकांनी तसेच सामान्य लोकांनीही त्यांच्या टि्वटला प्रतिसाद देताना अक्षरांवर कौतुकांचा वर्षाव केला.