लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील एका कार्यक्रमात स्थानिक केबल नेटवर्कला मुलाखत देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील, ‘मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटणारच’ असे मिष्किलपणे बोलून गेले. राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार न करता, त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अर्थाने बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही बातमी राज्यभर पसरली. एवढेच नव्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्री पाटील यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शविला. यावर शेवटी जयंत पाटील यांना खुलासा करावा लागला. मुख्यमंत्री पदाची चर्चा मात्र इस्लामपूर मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.
मोदी लाटेत राष्ट्रवादीची पीछेहाट पाहता, इस्लामपूर मतदारसंघात या पक्षाला धक्काही लागला नाही. या मतदारसंघातील स्थनिक पातळीवर इस्लामपूर पालिकेतील सत्तांतर वगळता जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. अशा अडचणीत पक्षनेते शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर दिलेली जबाबदारी जोखमीची होती. भाजपमध्ये ऑफर असतानाही त्यांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठा ढळू दिली नाही. भाजप सरकारने त्यांना लॉटरी घोटाळ्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला. तेव्हाही तत्कालीन आ. पाटील डगमगले नाहीत. ज्यांनी-ज्यांनी पवार घराण्याशी गद्दारी केली, ते आता पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पेलताना विधानसभा निवडणुकीपासून ते काका-पुतण्याचा रुसवा काढणेपर्यंत पवार घराण्याच्या पायऱ्या झिजविताना जयंत पाटील यांचा संयम ढळला नाही. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या या अपार, मुत्सद्दी, राजकीय कसरतीने अजित पवार यांचा रुसवा तर गेलाच आणि ते महाआघाडीत उपमुख्यमंत्री झाले, याचे पूर्ण श्रेय जयंत पाटील यांना द्यावे लागेल. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यापासून ते महाआघाडीचे सरकार स्थापण्यापर्यंत त्यांचे योगदान पाहता आणि मंत्रिमंडळात विविध महत्त्वाची खाती सक्षमपणे सांभाळल्यानंतर, जयंत पाटील यांनी मुखमंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त केली, हे योग्यच असल्याचे मत इस्लामपूर मतदारसंघातून व्यक्त होत आहे.
फोटो सिंगल जयंत पाटील