सुरेंद्र शिराळकर -- आष्टा नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. आष्टा नगरपरिषदेत माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील गटाला डावलले जात असल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. माजी आ. विलासराव शिंदे गट व आ. जयंत पाटील गट सत्तेत एकत्र असले तरी, पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक पद खुणावू लागल्याने, शिंदे गटाविरुध्द आ. पाटील गट वेगळी भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आष्टा नगरपरिषदेत विलासराव शिंदे गटाची निर्विवाद सत्ता आहे. नव्वदीच्या दशकातील शिंदे-पाटील संघर्षानंतर दोन्ही गटाचे नेते एकत्र आले आहेत. बेरजेचे राजकारण करीत आष्टा पालिका विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली जात आहे. मात्र दोन्ही नेते एकत्र असताना आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील गटाला डावलले जात असल्याची भावना असून येणारी पालिका निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. आ. जयंत पाटील यांनी विजय मोरे, सौ. नीता किरण काळोखे, जभिलाबी आब्बास लतीफ, सौ. संगीता सुनील वारे, सौ. पद्मश्री प्रशांत मालगावे, आनंदराव ढोले यांना नगरसेवक म्हणून पाच वर्षासाठी संधी दिली आहे, तर आनंदराव कुशिरे, मुकुंद इंगळे, ताहेर मुन्शी, संदीप तांबवेकर, के. ए. माने यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. जयंत पाटील यांनी राजारामबापू कारखाना संचालक म्हणून विराज शिंदे, माणिक शेळके यांना संधी दिली आहे, तर सौ. उज्ज्वला विजय पाटील यांना राजारामबापू दूध संघ, सौ. अनिता अशोक वग्याणी यांना राजारामबापू बँकेत संचालक म्हणून संधी दिली आहे. बबन थोटे यांना शेतकरी विणकरी सूतगिरणीचे अध्यक्षपद दिले आहे. ‘सर्वोदय’चे संचालकपद अशोक वग्याणी, रघुनाथ जाधव यांना दिले आहे. आष्टा शहरातील बँक, पतसंस्था, सोसायट्या, पाणी पुरवठा संस्थांवर जयंत पाटील गटाचे वर्चस्व कायम आहे.अनेक युवा नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, तर अनेकांची उमेदीची वर्षे राजकारणात जाऊन सुध्दा त्यांना संधी मिळाली नसल्याने, आ. जयंत पाटील स्वत:च्या गटातील कार्यकर्त्यांना संधी देत वेगळी चूल मांडणार, की पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना तहासाठी पाठवून बेरजेचे राजकारण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांचे दुर्लक्ष : प्रभाग समित्या रखडल्याआ. जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे जिल्हा व राज्याच्या राजकारणात एकत्र असल्याने आष्टा पालिकेत आ. पाटील लक्ष देत नाहीत. अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र लढण्यासाठी नेत्याचा आशीर्वादच नसल्याने अनेक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल पाटील आहेत. मात्र दोन्ही गटातील मतभेदामुळे मागील अनेक वर्षापासून त्यांना प्रभाग समित्याही स्थापना करता आलेल्या नाहीत.
आष्ट्यात जयंतराव गट अस्वस्थ
By admin | Published: August 22, 2016 11:55 PM