गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीवर नगरसेवकांच्या निवडी रखडल्या आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नगरसेवकांना डीपीडीसीवर संधी मिळेल, अशी आशा होती. तसे स्थायीसह विषय समित्यांवर वर्णी न लागलेल्यांना डीपीडीसी सदस्य करून त्यांची भालवण करण्याची परंपरा जुनीच आहे. किमान सदस्य म्हणून तरी त्यांना मिरविता येते. आता या सदस्य निवडी का रखडल्या याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकाने याबाबतचा किस्सा सांगितला. त्याचे असे झाले... सहा- सात महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने निवडीचा कार्यक्रम जाहीर केला, पण त्याची पालकमंत्री जयंत पाटील यांना काहीच कल्पना नव्हती. राष्ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, काँग्रेसचे संतोष पाटील हे मुंबईत कामानिमित्त गेले होते. त्यांनी जयंतरावांची भेट घेतली. चर्चेत डीपीडीसी सदस्य निवडीचा विषय निघाला. कार्यक्रम जाहीर झाल्याचे कळताच जयंतरावांनी दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आता निवडीचा कार्यक्रम थांबविता येणार नाही, त्यामुळे सदस्यांची नावे निश्चित करावी लागतील, असे संतोष पाटील म्हणाले. त्यावर जयंतरावांनी ‘हो का’ इतकेच उत्तर दिले. बागवान, पाटील हे मुंबईहून सांगलीत येईपर्यंत निवडीचा कार्यक्रम बारगळला होता. याची माहिती मिळताच दोघांनी एकमेकांना हात जोडले होते.
जयंतराव ‘हो का’ म्हणाले अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:31 AM