अशोक पाटील - इस्लामपूर -वाळव्याचा वाघ (जयंत पाटील) आणि शिराळ्याचा नाग (शिवाजीराव नाईक) यांच्यातील राजकीय संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. २00९ च्या विधानसभा निवडणुकीत वाघाने नागाला थोपवले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक विजयी झाले होते. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वाघाला नागावर मात करता आली नाही. याची सल आजही त्यांच्या मनात आहे. नाईक यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या कासेगाव व नेर्ले जि. प. मतदारसंघातील नेत्यांच्या त्रिकुटाचे नेर्ले येथील कार्यक्रमात जाहीर अभिनंदन करून जयंत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. खास अभिनंदनातून त्यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेतच दिले आहेत. कासेगाव जि. प. मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील, त्यांचे चिरंजीव जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे आणि नेर्ले जि. प. मतदारसंघातील जि. प. चे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांचे वर्चस्व आहे.स्थानिक पातळीवरील निवडणुकीत हे दिग्गज नेते आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यशस्वी होत आहेत. परंतु गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कासेगाव आणि नेर्ले जि. प. मतदारसंघात राष्ट्रवादीला पिछाडीवरच रहावे लागले आहे. त्यातच यावेळी मानसिंगराव नाईक यांचाही पराभव झाल्याने ते जयंत पाटील यांच्या मनाला चांगलेच लागले आहे.नेर्ले येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभास हे तिघेही नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी, मानसिंगरावांना यंदा थांबावे लागले, याला हे तिघेच कारणीभूत आहेत, यासाठी त्यांचे खास अभिनंदन करतो, असा टोला मारताच कार्यक्रमस्थळी शांतता पसरली.कासेगाव व परिसरात देवराज पाटील यांचे वर्चस्व आहे. यामुळे जयंत पाटील यांनी त्यांना कमी वयात जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी या संधीचे सोने केले नाही, अशीच चर्चा आहे. तसेच आपल्याच पक्षातील शेजारील गावातील पदाधिकाऱ्यांना शह देण्यासाठी त्यांनी अंतर्गत खेळ्या केल्याचेही बोलले जात आहे. यामुळेच मानसिंगराव नाईक यांना कासेगाव आणि नेर्ले जि. प. मतदारसंघात मतांची आघाडी घेता आली नाही. हेच जयंतरावांना आजही सलत असून, त्यांनी लगावलेल्या या टोल्यामुळे त्रिकुटावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
खास अभिनंदनातून जयंतरावांची खेळी!
By admin | Published: January 18, 2015 11:39 PM