सांगली : सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी तूर्त नकार कळविला असल्याचे समजते. त्यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत दुजोरा दिला असून येत्या दोन दिवसात ते यासंदर्भात लेखी पत्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीला पाठविणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीने पर्यायी नाव सुचविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली आहे. गेल्या सात महिन्यांपासून सांगलीच्या महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. २७ जून रोजी प्रदेश कार्यकारिणीने या पदावर काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई यांची नियुक्ती केली. तसे पत्रही पाठवून दिले. या निवडीमुळे मदन पाटील यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून जयश्रीतार्इंना पक्षीयस्तरावर एखादे पद मिळावे, अशी अपेक्षा या गटातील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती. पण प्रत्यक्ष पद मिळाल्यानंतर, जयश्रीताई अनिच्छुक असल्याचे दिसून आले. त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही लेखी माहिती प्रदेश कार्यकारिणीला दिलेली नाही. तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, प्रदेश कार्यकारिणीने पर्यायी नाव सुचविण्याबाबत जयश्रीतार्इंनाच सांगितले आहे. येत्या दोन दिवसात याबाबतची भूमिका जयश्रीताई प्रदेश महिला काँग्रेस कमिटीकडे पत्राद्वारे स्पष्ट करण्याची शक्यता आहे. पर्यायी नाव सुचवितानाही त्यांना कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) भूमिकेकडे लक्ष येत्या दोन दिवसात पदाबाबत त्या आपली भूमिका स्पष्ट करण्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांनी त्यांना त्यांच्या भूमिकेबाबत पुनर्विचार करण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे जयश्रीताई पदाबाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत, याकडे आता पक्षीय कार्यकर्त्यांसह पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी जयश्रीताई पाटील अनिच्छुक
By admin | Published: July 04, 2016 12:14 AM