जयश्री पाटील यांना लवकरच महामंडळ - गृह राज्यमंत्री सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:58 AM2022-06-15T11:58:17+5:302022-06-15T11:58:50+5:30
जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्याचा शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला होता, मात्र तो अद्याप पाळलेला नाही.
सांगली : काँग्रेस नेत्या व जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांना लवकरच शासनाकडून महामंडळ मिळेल. मी स्वत: यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करीत आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी मदनभाऊ युवा मंचच्या कार्यकर्त्यांना दिली.
मंत्री पाटील यांनी मंगळवारी जयश्रीताई पाटील यांच्या घरी भेट दिली. जयश्रीताई पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी मंत्री पाटील यांचा सत्कार केला.
जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्याचा शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला होता, मात्र तो अद्याप पाळलेला नाही. राज्यात सत्तेच तसेच पक्षसंघटनेतही जयश्रीताई पाटील यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांना पक्षाने ताकद दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
मंत्री पाटील म्हणाले की, जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्यासाठी मी स्वत: प्रदेश श्रेष्ठींकडे शिफारस करणार आहे. याबाबतच निर्णयही झाला आहे. मात्र, ज्यावेळी महामंडळाच्या नियुक्त्या सुरू होतील त्यावेळी पाटील यांना नक्की संधी मिळेल. लवकरच महामंडळाच्या नियुक्त्या सरकार करणार आहे. मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे.
यावेळी नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार, संजय कांबळे, शीतल लोंढे, अमित लाळगे, अमोल झांबरे, उदय पाटील, मयूर बांगर, प्रवीण निकम, अवधूत गवळी आदी उपस्थित होते.