ढालगाव : जांभूळवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे ट्रॅव्हल बसला जीपने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सात जण ठार झाले. अकरा जण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. मृत व जखमी कर्नाटकातील बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आहेत.जमखंडी (जि. बागलकोट) येथून एक ट्रॅव्हल बस, क्रूझर जीप व एक कार अशी तीन वाहने सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी निघाली होती. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळवाडी फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे आल्यानंतर जीपने ट्रॅव्हल बसला मागून जोराची धडक दिली. त्यात जीपचा चक्काचूर होऊन पाच जण जागीच ठार झाले. दोघा गंभीर जखमींचा मिरजेला उपचारास नेताना वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नाहीत. अपघातात जीप व ट्रॅव्हल बसमधील एकूण ११ लोक जखमी झाले आहेत. यामध्ये रघुनाथ आण्णाप्पा सव्वाशे (रा. बिद्री), सतीश हवालदार, जानू वर्णा हवालदार, संकेत हवालदार (वय ८), संतोष हवालदार (वय १०), समर्थ हवालदार (९ वर्षे, सर्व रा. कौलगी, विजापूर), शिवाजी जाधव (२१), सुश्मिता संगापूर (२१, दोघे रा. तोगलबागी, ता. जमखंडी), सुजाता गळवे (२४, रा. अडीहुडी, ता. जमखंडी), सुमय्या मुल्ला (१९, चिकलगी, ता. जमखंडी), निवेदिता मुधोळ (१९, रा. मुधोळ, महालिंगपूर) यांचा समावेश आहे. दहा जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ग्रामस्थांकडून मदतकार्यअपघाताची माहिती कळताच चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील दत्तात्रय लोखंडे, अविनाश यमगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.