लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नाट्य, चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ कल्याण ट्रस्टच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त जीवन रक्षक व धन्वंतरी पुरस्काराचे वितरण लांबणीवर टाकले होते. आता ३० डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय कडणे यांनी सांगितले.
कोरोनामुळे यंदा रंगभूमीदिन व महाराष्ट्र दिन या दोन्हीचे पुरस्कार वितरण एकत्रच करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, बुधवारी कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ भवन येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होईल. यात समिता गौतम पाटील, डाॅ. अविनाश पाटील, विजयकुमार तोडकर यांना जीवनरक्षक पुरस्कार, मुस्तफा मुजावर, वैभव चौगुले यांना समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कोरोना योद्धा धन्वंतरी पुरस्कार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय साळुंखे, डाॅ. मिलिंद पोरे, डाॅ. भूपाल गिरीगोसावी यांना देण्यात येणार आहे, तर रंगभूमी सेवा गौरव पुरस्कारासाठी महिला भारूडकार सुप्रिया खरे व संजय सावंत-सदामते यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे कडणे यांनी सांगितले.