फलटण/लोणंद : फलटणमार्गे बारामती-लोणंद या रेल्वेमार्गासाठी १८६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तर २.५ हेक्टर जमीन मुख्य रेल्वे जंक्शनसाठी संपादित केली जाणार आहे. अनेक वर्षांपासूनच्या या लोहमार्गाला गती मिळणार आहे. त्यामुळे बारामती दक्षिण भारताला जोडली जाणार आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संपादन प्रक्रिया अडचणीची असते. त्यामुळे जमीन मालकांना थेट बाजारभावाप्रमाणेच मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी १५० कोटींची मागणी रेल्वेकडे केली आहे.त्यामुळे भूसंपादनासाठी येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. जागेचा ताबा दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. बारामती-लोणंद-फलटण या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव जवळपास २० वर्षांपासूनचा आहे. मात्र, बारामतीतून जाणारा मार्ग बागायती क्षेत्रातून जात असल्यामुळे त्याला विरोध होता. शेतकऱ्यांचा विरोध असल्याने हा मार्ग बारामतीच्या जिरायती भागातून घेण्याचा निर्णय झाला. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून हालचाली सुरू झाल्या. हा दक्षिण भारताला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गासाठी खास तरतूद करण्यात आली. मध्यंतरी प्रकल्प थांबला, असे सांगितले जात होते. मात्र, महसूल प्रशासनाने या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण केले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना थेट बाजारभावाप्रमाणे मोबदला दिला जाईल. त्यासाठी १५० कोटी रुपयांची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया २ महिन्यांनंतर होईल, असेही सांगण्यात आले.राज्यातील नव्या रेल्वेमार्गासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना केली आहे. त्यामध्ये बारामती-फलटण-लोणंद मार्गाचा देखील समावेश केला आहे. याच मार्गाला नव्याने उभारण्यात येणाऱ्या वैभववाडी-कोल्हापूर हा मार्गदेखील जोडला जाऊ शकतो. त्यामुळे दक्षिणोत्तर भारताला जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे. भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत रेल्वेमार्गांचे काम होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला सांगितले आहे. कंपनीची स्थापना केली असली, तरीदेखील भूसंपादन, मोजणी आदी कामांचे सोपस्कर महसूल प्रशासनालाच पार पाडावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)बारामतीच्या रेल्वे जंक्शनची जागा बदलली? : दक्षिणोत्तर बारामती जोडणारबारामतीच्या रेल्वे जंक्शनची जागा बदलण्यात आली आहे. आता बारामतीचे मुख्य जंक्शन कटफळ येथे होणार आहे. त्यासाठी ५ एकर जागा उपलब्ध केली जाणार आहे. यापूर्वी नेपतवळण येथे मुख्य रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. कटफळ परिसरात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक, मल्टिनॅशनल कंपन्या कार्यान्वित आहेत. माल वाहतुकीसाठी कटफळ मध्यवर्ती ठिकाण आहे. यापूर्वी एमआयडीसीने जागा संपादित केली आहे. त्यांच्याकडून घेऊन रेल्वेला हस्तांतरित केली जाणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. नेपतवळणला रेल्वे जंक्शन होणार असल्याने दोन वर्षांत त्या भागात जागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता जंक्शनच स्थलांतरित झाल्याने जागेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची धांदल उडाली आहे.पूर्वी गुळाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या बारामतीमध्ये नॅरो गेज रेल्वेमार्ग होता. सी. के.जाफर शरीफ रेल्वेमंत्री असताना बारामती-दौंड मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करण्यात आले. कोळशावरील रेल्वे इंजिनाची जागा डिझेल इंजिनाने घेतली. आता बारामती-फलटण-लोणंद मार्गाचे काम करण्यास दक्षिणोत्तर बारामती जोडणार आहे. फलटणपर्यंतच्या मार्गाचे काम मार्गी लागले आहे. फक्त बारामती तालुक्यातील काम राहिलेले आहे.
‘सिव्हिल’च्या आजारावर जालीम उपाय
By admin | Published: January 28, 2017 10:29 PM