विटा : मंगरूळ (ता. खानापूर) येथील राजाराम नामदेव ठोंबरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी विटा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या घटनेने मंगरूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मंगरूळ येथील राजाराम ठोंबरे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. दि. २० आॅक्टोबरला ते आपल्या कुटुंबियांसह मुंबई येथे मुलाकडे गेले होते. या कालावधित अज्ञात चोरट्यांनी ठोंबरे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी कपाटातील साहित्य विस्कटून ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचे नेकलेस, १० ग्रॅमचा लक्ष्मीहार व अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण साडेबावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या दागिन्यांची किंमत चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे १ लाख २५ हजार रुपये आहे. यावेळी चोरट्यांनी ठोंबरे यांच्या घरातील सुटकेस अण्णा चव्हाण यांच्या शेतात नेऊन फोडल्या होत्या.ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठोंबरे यांचे पुतणे मोहन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मुंबई येथे चुलते ठोंबरे यांना दिली. आज शनिवारी सकाळी ते गावी आल्यानंतर चोरट्यांनी दागिने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी राजाराम ठोंबरे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी जुन्या बाजारभावाप्रमाणे २५ हजार २०० रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची नोंद केली आहे. तपास हवालदार व्ही. एस. शेळके करीत आहेत. (वार्ताहर)
मंगरूळ येथील घरफोडीत सव्वालाखाचे दागिने लंपास
By admin | Published: November 02, 2014 12:35 AM