मिरज (जि.सांगली) : कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील सराफाच्या आठ लाख ४१ हजार रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम मात्र बॅगेत सापडली आहे. याप्रकरणी भारत रामचंद्र हसुरकर यांनी कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे.हसूरकर यांच्या तक्रारीबाबत रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करीत रेल्वे मिरजेत आल्यानंतर साडेतीन लाख रोख रक्कम गाडीतून हस्तगत केली. बॅगेतील साडेआठ लाखांचे सोने मात्र चोरट्यानी लंपास केले. कोल्हापूर येथील सराफ भारत रामचंद्र हसूरकर (रा. कोल्हापूर) हे सोनार व्यवसायानिमित्त कलबुर्गी येथे गेले होते. बुधवारी सकाळी कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने ते परत येत असताना प्रवासात चोरीची घटना घडली. हसूरकर प्रवासादरम्यान कुर्डूवाडी येथे चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर एस वन बोगीतील सीटवरून अज्ञात चोरट्याने त्यांची सोने व रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. याबाबत भारत हसूरकर यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अडीच तासांत मिरज रेल्वेस्थानकात पोहोचलेल्या कलबुर्गी एक्स्प्रेसच्या एस वन बोगीत हसूरकर यांची बॅग शोधून काढली. या बॅगेत तीन लाख ५० हजार रोख रक्कम तशीच होती. मात्र, आठ लाख ४१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याचे निदर्शनास आले.
कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसमधून साडेआठ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:59 PM