सांगली/कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे घरफोडीत सव्वादोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सदाशिव शामराव कापसे (वय ५५, रा. दत्त मंदिराशेजारी, कसबे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली.सोमवारी रात्री ही घरफोडी झाली. कापसे हे घर बंद मागील खोलीत झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या पुढच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत देव्हाऱ्याच्यावर ठेवलेल्या बॉक्समधील सोन्याचे व चांदीचे दागिने ताब्यात घेतले. त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे वेढण, अंगठी, चांदीचे पैंजण, बिचवा अशा ऐवजाचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत २ लाख २८ हजार ५१८ रुपये होते.पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घराची पाहणी करून तपासासाठी सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका बाबर अधिक तपास करीत आहेत.
मुलीच्या विवाहाच्या दागिन्यांची चोरीकापसे यांनी मुलीच्या विवाहासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. कुटुंबीयांना दाखवून दागिन्यांचा सोन्याचा बॉक्स देव्हाऱ्याजवळ ठेवला होता. सकाळी उठल्यावर त्यांना दरवाजा उघडा असल्याचे दिसले. स्वयंपाकघरात पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वानाने तुकाराम मंदिरापुढे समाज मंदिरापर्यंत माग दाखवला. कापसे यांच्या मुलीचा विवाह १८ एप्रिल रोजी आहे. आता लग्नासाठी दागिने कोठून आणायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.