ओळ: कुंडल येथील अहिल्यानगर ट्रान्स्फाॅर्मर वीज पडल्याने नादुरुस्त झाला हाेता. वीज कर्मचाऱ्यांनी चार तास अथक प्रयत्न करून ताे सुरू केला.
अशुतोष कस्तुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
पलूस : सोसाट्याचा वारा.. तुफान पाऊस.. विजेची बत्ती गुल.. सगळे घरात बसलेले अशा परिस्थितीत हातात बॅटरी, पक्कड घेऊन आणि उरात काळजी घेऊन, भर पावसात विजेच्या खांबांवर चढून कुंडल (ता. पलूस) गावाला अंधारातून बाहेर काढण्यासाठी २६ एप्रिलच्या मध्यरात्री दहा वीज कर्मचारी सलग चार तास झुंजत होते.
साेमवारी रात्री आठच्या दरम्यान कुंडल आणि परिसरात सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यासह पाऊसही दाखल झाला. पावसात अहिल्यानगर येथील डीपीवर वीज कोसळली. कुंडल फाटा, स्मशानभूमीलगतचा विजेचा खांब उन्मळून पडला. किर्लोस्कर कंपनीकडे जाणारी वीजवाहिनी या पावसात तुटली. काही ठिकाणी झाडे या वाहिन्यांवर उन्मळून पडली. हा सगळा उत्पात वरुणराजाने माजविला होता. यामुळे वीज खंडित झाली. कुंडल परिसरातील नागरिक हैराण झाले होते.
कुंडल महावितरण कार्यालयांतर्गत ११ केव्ही लाईन गेलेली कुंडल, दह्यारी, तुपारी ही गावे येतात, तर देवराष्ट्रेला एक वाहिनी गेली आहे. तसेच मोहिते वडगावला जाणारी वाहिनीही खराब झाली होती. किर्लोस्कर कारखान्याकडे जाणारी ३३ केव्ही विजेच्या वाहिनीवर पत्रा उडून आल्याने तेथेही वीज खंडित झाली होती. या सगळ्या वीज वितरिकेच्या जोडण्या, दुरुस्ती करून रात्री तीनच्या सुमारास वीज सुरू केली.
पलूस येथील मुख्य अभियंता राजेंद्र बारशिंग, कुंडल कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भोसले, गणेश दिंडे, उमेश हेंद्रे, रामभाऊ दुडके, तेजस वरुडे, इम्रान मुल्ला, संतोष जाधव हे अविरत वीज जोडणीसाठी काम करत होते. मध्यरात्री तीन वाजता कुंडलला वीज सुरू केली आणि यांच्या जिवात जीव आला.