सांगली : केंद्रातील भाजप सरकार रोजगार देण्याची स्वप्ने रंगवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेत आहे. लाखो तरुणांचे रोजगार हिरावून घेण्याचे पाप सरकार करत आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.सांगलीत गुरुवारी रात्री काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या सांगतेप्रसंगी हिराबाग कॉर्नरला झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. देशाची न्याययंत्रणा अद्याप सुस्थितीत असल्याने राहुल गांधी यांना खासदारकी परत मिळाली. आता पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्याने झोपलेल्या सरकारला जग येत आहे. निवडणुका जवळ आल्याने आता सरकारला लोकांची आठवण येत आहे. गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत.पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीचे प्रश्न विधानसभेत आजवर ताकदीने मांडले गेले नाहीत. रस्ते, सांडपाणी, शेरीनाला हे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. आम्ही विश्वजित कदम यांच्याकडे शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव दिल्यानंतर तातडीने ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी २३२ कोटी रुपये मंजूर केले. आम्ही जिल्ह्याचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे सोपविले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकात आमदारकी व खासदारकी काँग्रेसकडे राहील याचा विश्वास आहे.यावेळी जितेश कदम, जयश्रीताई पाटील, यांनीही भूमिका मांडली. सभेला सुभाष खोत, मालन मोहिते, बिपीन कदम, मनोज सरगर, अभिजित भोसले, ॲड. भाऊसाहेब पाटील, करीम मेस्त्री, आशिष कोरी, मंगेश चव्हाण, सिकंदर जामदार, अजित ढोले हेदेखील उपस्थित होते.
सरकारची पाकीटमारीविश्वजित कदम म्हणाले, ७५० रुपयांचे सिलिंडर १२०० करून आता २०० रुपये कमी केले. पण, आमचे हजार रुपये जाताहेत त्याचे काय? ही तर सरकारची पाकीटमारीच आहे. केवळ लोकांना भुलवायचे काम सध्या सुरू आहे.