सांगली : पत्रकारांनी समाजाचा आरसा बनून काम केले पाहिजे. पण सध्या काही प्रसारमाध्यमे न्यायाधीश बनले आहेत. त्यातून अनेकांना नाहक त्रास झाला आहे. पत्रकारांनी आरसा बनून दुर्लक्षित व उपेक्षित लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी व्यक्त केली.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, डाॅ. उदयसिंह पाटील, डाॅ. शीतल धनवडे, डाॅ. पंकजा पलंगे, डाॅ. शंकर दुधवाणी, सामाजिक कार्यकर्त्या कलावती पवार यांच्यासह पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी होते.
डाॅ. कदम म्हणाले की, कोरोनाच्या संकटात अनेकांनी कष्ट घेतले. सफाई कामगारापासून डाॅक्टर, नर्स, पोलीस, अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. जिल्हाधिकारी व सीईओंनी योग्य नियोजन केल्याने कोरोनाच्या संकटात जिल्ह्याला दिलासा मिळाला. पत्रकारांनीही या संकटात मोलाची भूमिका बजाविली आहे. सध्या प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलले आहे. वृत्तपत्रांचा वापर चांगल्यासाठी व्हावा, त्याचा गैरवापर होऊ नये. सत्य आणि वस्तुस्थितीतून लोकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जितेंद्र डुडी, डाॅ. उदयसिंह पाटील यांचीही भाषणे झाली. शेखर जोशी यांनी स्वागत, तर संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.
चौकट
मीही पत्रकार होतो
मीही पत्रकार म्हणून काम केले आहे. २००६ मध्ये जर्मनीतील फुटबाॅल विश्वचषकाचे वार्तांकन २३ दिवस करत होतो. तेव्हा पत्रकारांचे काम किती अवघड आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर शिक्षण क्षेत्राबाबत लिखाण केल्याचे डाॅ. कदम यांनी सांगितले.
फोटो ओळी :- सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांच्याहस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. अभिजित चौधरी, जितेंद्र डुडी उपस्थित होते.