सांगली : घराची नोंद घालून ‘८ अ’चा उतारा देण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना जुळेवाडी (ता. तासगाव) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विश्वनाथ चनमल्लप्पा किट्टद (वय ४९, रा. साई पॅलेस अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग, सांगली) असे त्याचे नाव आहे. जुळेवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात आज, मंगळवारी पावणेपाचला ही कारवाई झाली.संबंधित तक्रारदार जुळेवाडीतील आहेत. त्यांना त्यांच्या मुलांची व नातेवाइकांच्या घराची ‘८ अ’ रजिस्टरला नोंद घालून ‘८ अ’चा उतारा पाहिजे होता. यासाठी त्यांनी ग्रामसेवक किट्टद यांची भेट घेतली. किट्टदने या कामासाठी २५ हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. त्यावेळी किट्टदने उतारा देण्यासाठी २५ ऐवजी दहा हजारांची मागणी करून त्यातील सहा हजार रुपये तातडीने आणून देण्यास सांगितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.तक्रारदाराने किट्टदला लाचेची रक्कम आज देतो, असे सांगितले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावला. त्यानुसार आज सायंकाळी तक्रारदाराकडून सहा हजारांची लाच घेताना किट्टद यास पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. किट्टदला उद्या, बुधवारी तासगाव येथील न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जुळेवाडी ग्रामसेवकास लाच घेताना अटक
By admin | Published: January 07, 2015 12:14 AM