आॅनलाईन लोकमत
मिरज : जोधपूर-बेंगलोर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन चौघांचा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. गुंगीच्या औषधामुळे बेशुध्द झालेल्या चौघा प्रवाशांना मिरजेत शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रविवारी रात्री सुरत ते बलसाडदरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातील जोधपूर परिसरातील नेमाराम (वय ४७), त्यांची मुलगी सहरादेवी (२०), फुलदेवी (४५) त्यांचा मुलगा तुळशीराम (२२) हे चौघेजण जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसच्या एस-८ या आरक्षित बोगीतून बेंगलोरला निघाले होते.
गुजरातमधील सुरत स्थानकात त्यांच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने त्यांच्याशी गप्पा मारत या चौघांनाही शीतपेय पिण्यास दिले. शीतपेय पिल्यानंतर चौघेही बेशुध्द झाले. त्यानंतर बेशुध्द झालेल्या चौघांचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा लाखोचा ऐवज चोरून अज्ञात चोरट्याने पलायन केले.
रेल्वेत बेशुध्द अवस्थेत पडलेल्या चौघांबाबत इतर प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला माहिती दिल्यानंतर, रेल्वे मिरज स्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी चौघांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या चौघांवरही उपचार सुरू असून, त्यांचा किती ऐवज चोरीला गेला, याचा नेमका आकडा समजलेला नाही.
रात्रीच्या रेल्वेगाड्यांत वारंवार चोऱ्यांचे प्रकार सुरू असून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरवर्षी सण व सुटीच्या हंगामात रेल्वे प्रवासाला गर्दी असल्याची संधी साधून चोरटे प्रवाशांच्या किमती ऐवजाची चोरी करतात. यावषीर्ही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांत चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. वारंवार चोरीच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासी हैराण आहेत. (वार्ताहर)