सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदेशीर भ्रूणहत्या प्रकरण लवकरात लवकर न्यायपटलावर येऊन पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
म्हैसाळ गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. खिद्रापुरे याच्या अघोरी उपचाराने मृत झालेल्या खंडेराजुरी येथील स्वाती जमदाडेच्या आईवडिलांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. पाच वर्षात हे प्रकरण अद्याप न्यायालयासमोर नाही.सरकारी वकील नाही. आरोपी मोकाट आहेत, अशी खंत जाधव दाम्पत्याने व्यक्त केली.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन मंत्री, अधिकाऱ्यांनी ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देऊ असे आम्हाला सांगितले होते. पण असे झाले नाही. क्रूरकर्मा खिद्रापुरेचा पुन्हा म्हैसाळ येथेच बिनबोभाटपणे दवाखाना चालू असून या खटल्यातील सर्व आरोपी बाहेर आहेत. शासनाने अद्याप वकीलच दिला नसल्यामुळे केस बोर्डावरच नाही.
यावर जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. अजून त्या आरोपींना शिक्षा झाली नाही का? इतके वर्ष मला का सांगितलं नाही? मी तत्काळ लक्ष देतो आणि याची माहिती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन त्यांना दिले. यावेळी पीडित मुलीचे वडील सुनील जाधव, विजया जाधव, सुधाकर जाधव, नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, रवीकुमार हजारे, बाळासाहेब होनमोरे उपस्थित होते.