विटा : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे विक्रीसाठी आणलेल्या १७ तलवारींचे प्रकरण ताजे असतानाच आता विटा येथे विक्रीसाठी आणलेले जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलास येथील बळवंत महाविद्यालयाजवळ अटक करून त्याच्याकडून ४० हजारांचे पिस्तूल, ५०० रुपयांचे जिवंत काडतूस आणि दुचाकी, असा सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सांगलीच्या पोलिस अधीक्षकांनी शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस तालुक्यात कोम्बिग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑलआऊट ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विट्यात पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे, अमर सूर्यवंशी, राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आणि महेश देशमुख हे विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी विटा ते खानापूर रस्त्यावर बळवंत कॉलेजजवळील टेंभू योजनेच्या कॅनॉलवर अल्पवयीन मुलगा देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावेळी पोलिस निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता, तो संबंधित व्यक्ती आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक मॅगझिन असलेले, त्याच्या मुठीस दोन्ही बाजूस प्लास्टिकचे काळ्या रंगाचे कव्हर असलेले देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत राउंड काडतूस होते. त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, ५०० रुपये किमतीचे एक जिवंत राउंड आणि ५५ हजार रुपयांची दुचाकी, असा एकूण ९५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन संशयितास अटक, सांगलीतील विट्यात कारवाई
By श्रीनिवास नागे | Published: June 17, 2023 6:18 PM