कवठेमहांकाळ : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यामुळे अजितराव घोरपडे गटात चिंतेचे वातावरण आहे.विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एकसंध असणाऱ्या भाजपमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून संशयकल्लोळ आहे.
माजी मंत्री अजितराव घोरपडे व खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कवठेमहांकाळ शहरात विकास सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घोरपडे गटाने घेतला. यावेळी घोरपडे गटाने पालकमंत्री सुभाष देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.विधानसभेची भाजपची उमेदवारी घोरपडे यांनाच मिळाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनीही सावध भूमिका घेत, आपण पोस्टमन असल्याचे सांगत, पक्षाकडे भावना पोहोचवू, असे सांगून वेळ मारून नेली.यातच खासदार पाटील यांच्या गटाच्या चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब पाटील, दादासाहेब कोळेकर, व्यंकटराव पाटील, हायूम सावनूरकर, अनिल शिंदे, सविता माने, महादेव सूर्यवंशी, दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कृष्णा पतसंस्थेच्या उद्घाटनाचे निमित्त साधून कार्यक्रम घेतला. खासदार गटानेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने ज्योतिताई पाटील यांनीही विधानसभेच्या तयारीत असल्याचे उघड केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ज्योतिताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे गटाला जणू इशाराच दिला आहे.अगदी महिन्याभरापर्यंत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी अजितराव घोरपडे यांना पक्की समजली जात होती. नेत्यांनी त्याबाबत त्यांना शब्द दिल्याचीही चर्चा होती, परंतु ज्योतिताई पाटील यांच्या कवठेमहांकाळमधील ह्यएंट्रीह्णने चुरस निर्माण झाली आहे. तालुक्यात आता विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.