खानापूर : येथील वेणूताई चव्हाण महिला शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष व प्रसिद्ध डॉक्टर के. आर. पवार (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. पवार यांनी अत्यंत गरिबीत वैद्यकीय पदवी घेतली. नंतर शिक्षण संस्थेची स्थापना १९८९ मध्ये केली. १९९० मध्ये त्यांनी येथे मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय सुरू केले. मातोश्री वेणूताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १९९४, भूड येथील न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना २००० साली, तर सौ. शोभादेवी पवार इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना २००४ मध्ये केली. या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
डॉ. पवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीस वर्षे सेवा केली. त्यांचे राहणीमान साधे, मात्र बोलणे स्पष्ट आणि सडेतोड होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.