सांगली : कडकनाथ कोंबडी पालनातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांची १ कोटी ५४ लाख ६६ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली.फलटणच्या फुडबर्ड अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत सांगली शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण (जि. सातारा) येथील फुडबर्ड अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना कडकनाथ कोंबडी पालनातून व्यवसायाच्या संधीबाबत आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, यातून दीड कोटीची फसवणूक झाली होती.
याप्रकरणी सांगली शहर पोलिसात ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे (दोघेही रा. सरडे, ता. फलटण) व सचिन तुकाराम करे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांना सोमवारी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित दळवी, प्रियांका शेळके, सुनील भिसे, अमोल लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, दीपाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.