सांगली/इस्लामपूर : शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आलिशान कार्यालय थाटून एका कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून मालामाल करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस येत आहे. या कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती असून सुमारे आठ हजार गुंतवणूकदारांची ५०० कोटींपेक्षा अधिक रक्कम ‘कडकनाथ’च्या गोरख धंद्यात अडकली आहे. गुंतवणूकदारांचा तगादा मागे लागल्याने इस्लामपूर, सातारा, कोल्हापूर कार्यालयांतील कंपनीचे संचालक परागंदा झाले आहेत.
कडकनाथ कोंबडीची जात मध्य प्रदेशातील झांबुआ या आदिवासी पट्ट्यातील आहे. वैद्यकीयदृष्ट्या या कोंबडीची प्रजाती मानवी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. ही कोंबडी काळी, तिचे रक्त काळे, मांस काळे आणि होणारा रस्साही काळा असल्यामुळे या कोंबडीचे अनेकांना आकर्षण वाटते. त्यातूनच कडेगाव आणि वाळवा तालुक्यातील काहीजणांनी दोन वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना केली. इस्लामपूर शहरातील बसस्थानक परिसरात इमारतीमध्ये आलिशान कार्यालय काढण्यात आले. सातारा आणि कोल्हापूरमध्येही शाखा सुरू झाल्या. बाजारपेठेचे सर्वेक्षण करून वाळवा तालुक्यात नव्या योजनेची पहिल्यांदा सुरुवात करण्यात आली. केवळ ७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ३०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी घ्या आणि अवघ्या १० महिन्यात किमान ३ लाख ५० हजार रुपये मिळवा, अशी योजना आखून तिचा प्रसार करण्यात आला.शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी ‘कडकनाथ’च्या जाळ्यात फसले. सुरुवातीला कंपनीकडून ७५ हजार रुपयांच्या मोबदल्यात ३०० पक्षी, खाद्य, औषधे, साहित्य आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे करारपत्र करून दिले जात होते.मात्र या करारपत्रावर कोणत्याही संचालकाची स्वाक्षरी नसल्याचे समजते. ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातील २०० कोंबड्या घेऊन जाते.
यावेळी शेतकऱ्याकडे १०० कोंबड्या राहतात. त्यामध्ये २० कोंबडे ठेवले जातात. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्या की, पुढील सहा महिने कंपनी सरासरी ६० रुपये दराने अंडी खरेदी करते. त्यापोटी शेतकºयाला २ लाख ५० हजार रुपये मिळतात.
दहाव्या महिन्यापर्यंत टिकलेल्या (मर सोडून) कोंबडी ३०० रुपये आणि कोंबडा ५०० रुपये या दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली. त्यातून किमान एक लाखाचे उत्पन्न मिळत असे. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालाही. मात्र त्यानंतर हळूहळू कंपनीची गाडी रुळावरून घसरत निघाल्याने आर्थिक कोंडी होऊ लागली.त्यातूनच मग अंड्यांची खरेदी नाही, कोंबड्यांची खरेदी नाही, औषध-वैद्यकीय सेवा नाही आणि शेवटी पैसेही नाहीत. अशा चक्रव्यूहात राज्यातील आठ हजार गुंतवणूकदार अडकले आहेत. ५०० कोटीहून अधिक रकमेची ही फसवणूक असल्याचा अंदाज आहे.
अल्पावधित राज्यभर पसरलेल्या या कंपनीच्या संचालकांनी प्रसारमाध्यमातून ध्वनिफिती आणि चित्रफितीच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली. त्यामुळे पश्चिम महाराष्टÑासह विदर्भ-मराठवाड्यातील अनेकांनी गुंतवणूक केली. सुमारे तीन ते पंचवीस लाखापर्यंतच्या रकमा गुंतवल्याचे समजते.दैनंदिन जमा १ कोटी २५ लाखकंपनीकडे दिवसाकाठी १ कोटी २५ लाखांपर्यंतची रक्कम जमा होत असे. त्यातील २०-२५ लाखांची रक्कम कंपनीच्या बॅँक खात्यावर भरली जायची, तर उरलेली एक कोटीची रोजची रोकड संचालकांच्या घरी जात असल्याची चर्चा आहे.कोटीची उड्डाणे : कंपनीच्या संचालकांनी मोठ्या शहरात आलिशान फ्लॅट, बंगले अशात गुंतवणूक केल्याचे समजते. एका संचालकाने तर १ कोटी १० लाखाची महागडी मोटार खरेदी केली आहे.
कंपनीने शेतकºयांशी केलेल्या कराराप्रमाणे त्यांना त्यांचा मोबदला त्वरित द्यावा. शेतकºयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शेतकºयांना त्यांचे पैसे न मिळाल्यास या फसव्या कंपनीविरुद्ध राज्यभरातील शेतकºयांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभे करेल.- भागवत जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना