पूर्वीच्या खानापूर तालुक्यातील ४२ गावे आणि तासगाव तालुक्यातील १३ गावे अशी ५५ गावे मिळून कडेगाव तालुक्याची स्थापना पतंगराव कदम यांच्या प्रयत्नाने झाली. २ जुलै १९९९ रोजी ३४ गावांची मिळून पलूस तालुक्याची निर्मिती झाली, तर ६ एप्रिल २००२ रोजी कडेगाव तालुका अस्तिवात आला.तालुक्याच्या निर्मितीनंतर कदम यांनी कडेगाव येथे तहसीलदार कार्यालय तसेच तालुक्यातील सर्व विभागांच्या कार्यालयांसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारली. कडेगाव व चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याची इमारत साकारली. कडेगाव व चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले आणि सुसज्ज इमारतीत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णसेवा सुरू केली.कडेगाव-पलूस तालुक्यांसाठी कडेगावला स्वतंत्र प्रांताधिकारी कार्यालय सुरू केले. वनमंत्री असताना वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय कडेगावला आणले. दुष्काळी भागास वरदान ठरणाºया ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी कदम यांचे बहुमोल योगदान आहे. तालुक्यातील २५ गावांच्या ९४५५ हेक्टर शेतजमिनीला ताकारी योजनेचे तर ३१ गावांच्या ९३२५ हेक्टर शेतजमिनीला टेंभू योजनेचे पाणी दिले. कदम यांनी शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे केली. कडेगाव तालुका विकासाचे रोल मॉडेल म्हणून नावारूपास आणला. कदम यांच्या प्रयत्नातून तालुक्यात गावोगावी ग्रामसचिवालयाच्या इमारती साकारल्या. तालुक्यातील विजापूर-गुहागर मार्गावर कडेगाव हद्दीत चौपदरीकरण केले.कडेगाव ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा आणि पलूस ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यात कदम यांचे बहुमोल योगदान आहे. कदम यांनी सोनहिरा कारखाना, सागरेश्वर सूतगिरणी, कृष्णा-वेरळा सूतगिरणी, वाईन पार्क, भारती विद्यापीठाची शाळा, महाविद्यालये पलूस व कडेगाव तालुक्यात सुरू केले.पंचायत समिती, पलूस पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, न्यायालय, प्रशासकीय इमारत यासह सर्व शासकीय कार्यालये एका आवारात आणल्याने नागरिकांना एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या.सांडगेवाडीत एमआयडीसीच्या माध्यमातून वाइन पार्कची उभारणी केली. या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. औदुंबर हे तीर्थक्षेत्र नावारुपास आणले. त्याचबरोबर आमणापूर, सुखवाडी, पुणदी येथे कृष्णा नदीवर पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.
कडेगाव, पलूसच्या विकासाचे शिल्पकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:41 AM