कडेगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात वेळेवर ऑक्सिजन बेड मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत, तर कित्येक रुग्ण कोरोनाच्या भीतीनेच दगावत आहेत. अशा स्थितीत सामाजिक संवेदनशीलताही हरवल्याचे विदारक चित्र कडेगाव तालुक्यात दिसत आहे.
मृत्यूशी झुंज देत असलेल्या कोरोना रुग्णांचे नातेवाईक बेड मिळविताना हतबल होत आहेत. एरव्ही गावोगावी
संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी
धावताना दिसणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीचे हातही गायब झाले आहेत.
काही गावांमध्ये सरपंच आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचा खडा पहारा व मदतकार्य सुरू आहे; परंतु अनेक गावांमध्ये एरव्ही सामाजिक कार्यात पुढे असणारे कार्यकर्ते माणुसकीची भूमिका
न साकारता बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लाखोंची उधळण करणारे गावपुढारी वर्तमान बिकट स्थितीत घरात दडलेले आहेत. या स्थानिक नेतेमंडळींनी केवळ तालुक्याच्या
प्रमुख राजकीय नेत्यांवर विसंबून न राहता स्वतःही आरशात पाहण्याची गरज आहे.
कोरोनाचे संकट हीच निवडणूक गृहीत धरून मदतीचे हात पुढे करण्याची गरज आहे. संवेदनशीलता हा मनुष्यप्राण्याचा उपजत गुण आहे. याच संवेदनशीलतेचा प्रत्यय देत आपत्तीच्या काळात कडेगाव तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी, समाजसेवी संघटनांनी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा भरघोस मदत केली आहे. आता मात्र कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गावोगावी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकमेकाला साहाय्य करणे हाच खरा धर्म मानून गोरगरीब कुटुंबातील रुग्णांच्या उपाचारासाठी मदत करण्याची गरज आहे.
चौकट
बेड उपलब्धतेसाठी मदतीची गरज
पिवळी, केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयात बेड मिळाला तर उपचार खर्चाचा बोजा कमी होतो. मात्र, तेथे बेड मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेथे बेड उपलब्ध झालाच नाही तर अन्य रुग्णालयात उपलब्ध करून देऊन शक्य ती मदत केली पाहिजे.