ओळ : कडेगाव येथील बालोद्यान स्थलांतरित करू नये. यासाठी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला.
कडेगाव : कडेगाव येथे नगर पंचायतीच्या माध्यमातून दत्त मंदिर परिसरात उभारण्यात आलेले बालोद्यान व ओपन जीम इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याविराेधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नागरिकांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांना दिले आहे. नागरिकांनी बालगोपालांसह बालोद्यानामध्ये जाऊन स्थलांतरास विरोध दर्शविला.
येथील नागरिकांच्या मागणीवरून नगर पंचायत प्रशासनाने येथे ओढ्याकाठी दत्त मंदिर परिसरात शहरालगत बालोद्यान व ओपन जीमची उभारणी केली आहे. तसेच येथे शेजारी असलेली धार्मिकस्थळे यामुळे नागरिक व बालगोपालांना हे ठिकाण म्हणजे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. दररोज शहरातील बालगोपाल व नागरिक मोठ्या संख्येने बालोद्यान व ओपन जीमचा लाभ घेत आहेत. असे असताना नगर पंचायत प्रशासनाने येथील बालोद्यान व ओपन जीम येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मिळताच बालोद्यान व ओपन जीम आहे तेथेच कायम ठेवावे. ते महात्मा गांधी विद्यालयात स्थलांतरित करू नये. अन्यथा येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर आनंदा रास्कर, जगदीश धर्मे, सुनील मोहिते, सुभाष धर्मे, आकाश धर्मे यांच्यासह ४५ नागरिकांच्या सह्या आहेत.