अतुल जाधव ।देवराष्ट्रे : डिजिटल स्वाक्षरीसह संगणकीकृत सात-बारा एका क्लिकवर उपलब्ध होणार, या सुविधेस कडेगाव तालुक्यात ब्रेक लागला आहे. तालुक्यातील ५५ पैकी एकाही गावचा सात-बारा आॅनलाईन दिसत नाही.
गेल्या चार वर्षापासून आॅनलाईन सात-बाराचे काम चालू असल्याने लोकांना तलाठी सापडत नव्हते. कामासाठी शंभर हेलपाटे मारावे लागत होते. आॅनलाईनच्या नावाखाली विहीर, कूपनलिका, खरेदीपत्र, कर्जासह हजारो नोंदी अडकून पडल्या आहेत. आॅनलाईनच्या कामात तलाठी कार्यालये ओस पडली होती. कारण तलाठी कार्यालयात कमी आणि तालुक्यात जास्त वेळ असायचे. शेतकरी वर्गास होणारा त्रास १ मे पासून कमी होईल, या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.
आॅनलाईन व संगणकीकृत सात-बारा करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदारांनी अहोरात्र कष्ट घेतले. अजूनही आॅनलाईन होण्यासाठी अनेक कामे अपूर्ण आहेत. ५५ पैकी एकाही गावचा सात-बारा आॅनलाईन दिसत नाही. त्यामुळे उतारा मिळण्यास उशीर लागणार आहे.