तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या दहा प्रभागातील २१ जागांसाठीची आरक्षण सोडत शनिवारी नाट्यगृहात पार पडली. प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत झाली. या सोडतीने ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली. अमोल शिंंदे, अजय पवार, शरद मानकर यांच्यासह काही विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट झाला, तर अविनाश पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह विद्यमान दहा नगरसेवकांना पुन्हा संधी असल्याचे स्पष्ट झाले. दहा प्रभागातील आरक्षण सोडत काय निघणार, याची तासगाव शहरासह इच्छुकांना मोठी उत्सुकता होती. सोडतीसाठी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह नगराध्यक्ष अविनाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक उपस्थित होते. दहा प्रभागांपैकी सहा प्रभागात खुल्या गटासाठी आरक्षण असल्याने या सहा जागांसाठी जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट आहे. आरक्षणाच्या हरकतींसाठी ५ ते १४ जुलैपर्यंत मुदत आहे. प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग १ १ अ : सर्वसाधारण महिला; १ ब सर्वसाधारण. प्रभाग २ २ अ : सर्वसाधारण महिला; २ ब सर्वसाधारण. प्रभाग ३ ३ अ : नामाप्र महिला; ३ ब सर्वसाधारण. प्रभाग ४ ४ अ : नामाप्र; ४ ब सर्वसाधारण महिला. प्रभाग ५ ५ अ : सर्वसाधारण महिला; ५ ब सर्वसाधारण. प्रभाग ६ ६ अ : नामाप्र महिला; ६ ब सर्वसाधारण. प्रभाग ७ ७ अ : नामाप्र; ७ ब सर्वसाधारण महिला. प्रभाग ८ ८ अ : नामाप्र; ८ ब सर्वसाधारण महिला. प्रभाग ९ ९ अ : अनुसूचित जाती; ९ ब सर्वसाधारण महिला. प्रभाग १० १० अ : अनुसूचित जाती महिला; १० ब; नामाप्र महिला; १० क सर्वसाधारण. (वार्ताहर) यांचा झाला पत्ता कट... निवडणूक लढवत असलेल्या पारंपरिक प्रभागात आरक्षणात बदल झाल्याने काही विद्यमान दिग्गजांचा पत्ता कट झाला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल शिंंदे, सुरेश थोरात, अनुराधा पाटील, काँग्रेसचे अजय पवार, काका गटाचे शरद मानकर यांचा समावेश आहे. यांना पुन्हा संधीची अपेक्षा... आरक्षण प्रक्रियेत काही विद्यमान नगरसेवकांच्या हक्काच्या प्रभागात जुनेच आरक्षण कायम राहिले. त्यामुळे या नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेवक बाबासाहेब पाटील, राजू म्हेत्रे, जाफर मुजावर, अनिल कुत्ते, रजनीगंधा लंगडे, विजया जामदार, सारिका कांबळे, राष्ट्रवादीच्या शुभांगी साळुंखे, भाजपच्या शिल्पा धोत्रे यांचा समावेश आहे.
तासगावमध्ये ‘कही खुशी कही गम’
By admin | Published: July 03, 2016 12:20 AM