कवठेएकंद : ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त साकारण्यात येणाºया शोभेच्या दारूच्या आतषबाजीची तयारी पूर्ण झाली आहे. आज, गुरुवारी होणाऱ्या पालखी सोहळ्याचा प्रारंभ रात्री नऊपासून मंदिरातून ‘श्रीं’च्या आरतीनंतर होणार आहे.
आसमंत उजळून टाकणाऱ्या हजारो औटांच्या सलामीने श्री सिद्धराज व बिरदेवाच्या पालखी सोहळ्यास शिलंगण चौकात पाटील कट्ट्यावर आपटा पूजन होऊन प्रारंभ होणार आहे. मानकरी चव्हाण पाटील, डवरी गोंधळी, गुरव पुजारी, बलुतेदार सेवेकरी, मानकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत दुतर्फा केलेल्या शोभेच्या दारूकामाची सलामी घेत पालखी मार्गक्रमण करणार आहे. या विजयादशमीच्या सोहळ्यासाठी कवठेएकंद नगरी सज्ज झाली आहे. नागाव कवठे येथे श्री नागनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आतषबाजी साजरी केली जाते.
यासाठी तरूण मंडळी, नागावकर परिश्रम घेत आहेत. नागनाथ मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.पारंपरिक दारूकामाबरोबरच नव्याने ताज्या घडामोडींवरील आतषबाजी करण्यासाठी काही मंडळांनी तयारी केली आहे. फुगडी, मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्यपान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारुकामाचे सादरीकरण होईल.
माळी मळा येथील माळी बंधू यांच्याकडून ‘फिरता सूर्य, पंचमुखी झाडकाम, तर अग्निपुत्र अजिंक्यतारा मंडळाची कागदी शिंगटांची खास आतषबाजी सादर होणार आहे. सिध्दिविनायकतर्फे सूर्य व आॅलिम्पिक फायर शो औटांची बरसात केली जाणार आहे. कोरे अड्ड्याची लाकडी शिंगटे, हर हर दारू शोभा मंडळ, अंबिका दारू शोभा मंडळ, श्रीराम, हिंदमाता, शहीद भगतसिंग, सिध्दिविनायक, शाक्यसिंह यांच्या औटांची आतषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. सिध्दराज फायर वर्क्सकडून पंचमुखी कारंजा, उगवता सूर्य आदी साकारले जाणार आहे.यात्रेनिमित्ताने गावातील व्यावसायिक बंधूंनी विद्युत रोषणाई, रंगरंगोटीसह सजावट केली आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, अग्निशमन दल यांच्यासह महसूल विभाग, पोलीस यंत्रणेने यात्रेनिमित्त अगोदरपासूनच तयारी केली आहे.
या सोहळ्यासाठी बाहेरगावी वास्तव्यास असणाºया कवठेएकंदकरांनी आवर्जून हजेरी लावली आहे. विजयादशमीच्या स्वागतासाठी कवठेएकंद सज्ज झाले आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आगाराकडून जादा बससेवा करण्यात आली आहे.यात्रेनिमित्ताने निकाली कुस्त्यांचे मैदान सिध्दराज देवालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. यात्रेकरूंच्या स्वागतार्ह गावात ठीक-ठिकाणी लक्षवेधी स्वागत कमानी उभारल्या आहेत.स्मृती मानधनाचे : आतषबाजीतून अभिनंदनए वन मंडळाकडून ‘केरळ महाप्रलय’, नयनदीप दारू शोभा मंडळाच्यावतीने खास आकर्षण ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’, सामाजिक संदेश देणारा ‘स्त्रीविरोधी राक्षसाचा आतषबाजीतून संहार’, तसेच भारतीय जवानांनी हेलिकॉप्टरमधून यशस्वी केलेला अतिरेक्यांवरील हल्ला आतषबाजीतून साकारण्यात येणार आहे. यासाठी तोडकर बंधू परिश्रम घेत आहेत. जमादार दारू शोभा मंडळाकडून सांगलीची क्रिकेटकन्या स्मृती मानधना हिला अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल आतषबाजीतून तिचे अभिनंदन करण्यात येणार आहे.