दत्ता पाटील तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राऊंड असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीने विरोधाचे जोरदार वातावरण केले, मात्र पडळकरांचा दखलपात्र ठरलेला वंचित्र फॅक्टर, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतलेली संधिसाधू भूमिका यामुळे विशाल पाटील धक्कादायकपणे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील यांनी मात्र मोदी लाटेवर निवडून आलेले खासदार, हा शिक्का पुसून स्वकर्तृत्वावर आपली व्होटबँक अबाधित असल्याचे दाखवून दिले.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात खासदार संजयकाका पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत संघर्ष करावा लागला होता. गतवेळच्या निवडणुकीत संजयकाकांना मोठे यश मिळाले. मात्र त्यावेळी मोदी लाटेवर निवडून आलेले खासदार असा शिक्का त्यांच्यावर बसला होता. मात्र त्यांनी गेल्या पाच वर्षातील कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:चा बालेकिल्ला भक्कम केला.विशाल पाटील यांची सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीवर भिस्त होती. मात्र राष्ट्रवादीतील नेत्यांनी संधीसाधू भूमिका घेतली. आपला खासदार म्हणून काही कारभाऱ्यांनी मवाळ भूमिका घेतली. दुसरीकडे आघाडी धर्माला बगल देत, अनेकांनी पडळकरांचा झेंडा खांद्यावर घेतला. पडळकरांच्या वंचित फॅक्टरचा या निवडणुकीत मोठा प्रभाव दिसून आला. मात्र या मतदारसंघात पडळकरांना मिळालेले मतदान हे केवळ वंचित फॅक्टरचे नसून, राष्ट्रवादीने केलेल्या गमती-जमतीचेदेखील असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन राष्ट्रवादीकडून वातावरण निर्माण केले. मात्र पक्षातील नेतेमंडळींनीच नरो वा कुंजरोवा भूमिका घेतल्याने, अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पडळकरांचा रसद पुरवली. मतदारसंघातील १०९ पैकी तासगाव तालुक्यातील ३५ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३४ अशा ६९ गावांमध्ये खासदार संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले.
गोपीचंद पडळकर यांना कवठेमहांकाळ तालुक्यातील २५ आणि तासगाव तालुक्यातील ३, अशा २८ गावांमध्ये मताधिक्य मिळाले, तर विशाल पाटील यांना तासगाव तालुक्यातील १० आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील फक्त २, अशा १२ गावांमध्ये मताधिक्य मिळाले.