सांगली - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगलीच्या शाखेच्यावतीने यावर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहर परिसरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, सुरेश आठवले व अरविंद लिमये यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष मुकूंद पटवर्धन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, डॉ. तारा भवाळकर यांना काकासाहेब खाडीलकर जीवन गौरव पुरस्कार, प्रा. वैजनाथ महाजन यांना आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार, सुरेश आठवले यांना प्रा. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार, अरविंद लिमये यांना प्रा. दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. रंगभूमीदिनाच्या पूर्वसंध्येला ४ नोव्हेंबर रोजी विष्णू भावे नाट्यगृहात ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीस विशेष सन्मान पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
तारा भवाळकर मराठी रंगभूमीवरील सांगली येथील पहिल्या रौप्यपदक विजेत्या महिला कलाकार आहेत. सामाजिक परिवर्तन उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. अनेक नाट्य, एकांकिका लेखन करुन त्याचे सादरीकरण केले आहे. त्यांचा राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे. वैजनाथ महाजन यांनी अनेक ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. सामाजिक भान ठेऊन सांगली कारागृहातील कैद्यांना शासनामार्फत शिक्षण दिले आहे. विविध विषयावर लेखन केले आहे. सुरेश आठवले यांनी देवल स्मारक मंदिर, भावे नाट्यगृह, एसटी महामंडळ यांच्या गद्य, संगीत नाटकांकरीता एकांकिका करीत प्रकाश योजनेचे काम केले. अनेक संगीत नाटकांना उत्कृष्ट प्रकाश योजनेचे पारितोषिक मिळविले आहे. अरविंद लिमये यांचे तीन कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक एकांकिकेचे त्यांनी लेखन केले आहे. साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, कविता प्रकाशित झाल्या आहेत.
यावेळी श्रीनिवास जरंडीकर, चेतना वैद्य, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी, विनायक केळकर, डॉ. दयानंद नाईक, विजय कडणे, प्राचार्य भास्कर ताम्हणकर, प्रसाद बर्वे उपस्थित होते.