अर्जुन कर्पे --कवठेमहांकाळ --कवठेमहांकाळच्या राजकीय कुरुक्षेत्रावर राष्ट्रवादी पक्षाला व आर. आर. पाटील आबा गटाला मोठा धक्का बसला असून, रांजणी पंचायत समिती गटातील विद्यमान पंचायत समिती सदस्य पतंग यमगर, माजी सरपंच अण्णाप्पा माने यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटात प्रवेश केला आहे. पंचायत समितीमध्ये सदस्यांच्या आकडेवारीत खासदार पाटील यांनी चौकार लगावला असून, आबा गटाचे चार, अजितराव घोरपडेंचे दोन आणि आता खा. संजयकाका गटाचे चार असे बलाबल झाले आहे. भविष्यात पंचायत समितीचे राजकारण ताब्यात घेण्याच्या हालचाली काका गटाकडून सुरू आहेत.२०१२ च्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने एकहाती सत्ता मिळविली. आबा गटाने पंचायत समितीत दहापैकी सात सदस्य निवडून आणले, दोन सदस्य घोरपडे गटाचे, तर एक अपक्ष निवडून आले. पंचायत समितीमध्ये आबा गटाच्या माध्यमातून एकहाती कारभार सुरु होता. परंतु आबांच्या निधनानंतर मतदारसंघातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली. अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपच्या खासदार गटात सामील झाले. सुरुवातीला पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती अनिल शिंदे, विद्यमान सभापती वैशाली पाटील, विद्यमान पंचायत समिती सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी थेट काकांच्या माध्यमातून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गळ्यात भाजपचा हार घालून घेतला आणि आबा गटाला धक्का दिला. या धक्क्यातून आबा गट व राष्ट्रवादी पक्ष सावरण्याआधीच, सोमवारी, ७ डिसेंबर रोजी रांजणी पंचायत समिती सदस्य पतंग यमगर यांनी सांगली येथे काकांच्याहस्ते सत्कार स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश केला, तर आशाताई पाटील, बाळासाहेब कुमठेकर हे दोन सदस्य अजितराव घोरपडे गटाचे आहेत आणि विद्यमान सभापती वैशाली पाटील, अनिल शिंदे, पतंग यमगर, शिवाजी चंदनशिवे हे चार सदस्य आता काका गटाचे झाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये आता भाजपचे तोडीस तोड सदस्य आहेत. यामुळे यापुढील काळात पंचायत समितीच्या राजकारणात व कारभारात काका गटाचे वजन वाढले आहे. पंचायत समितीचा कारभार आता काका गटाशिवाय अशक्य आहे. सभापती बदलाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हालचाली आता काका गटाने फोडाफोडीचे राजकारण करुन पूर्णपणे थंड केल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात काका गटाचे काही नाही म्हणणाऱ्यांना, पंचायत समिती कोणाची, याचे उत्तर राष्ट्रवादी पक्षाला देणे कठीण होऊन बसले आहे.‘काकां’चे प्राबल्य : आबा गटास चिंताआणखी एक पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीतून संजयकाका गटात गेल्याने आधीच राजकीय चक्रव्यूहात सापडलेल्या आबा गटाला आणखी फटका बसला आहे. पतंग यमगर यांच्या पक्षप्रवेशाने पंचायत समितीमधील राजकीय बलाबल बदलले आहे. आता राष्ट्रवादीचे अर्थात आबा गटाचे चार, अजितराव घोरपडे गटाचे दोन, तर संजयकाका गटाचेही चार सदस्य पंचायत समितीचा कारभार पाहणार आहेत. एकंदरीत बलाबल पाहता, उषाताई माने, सुरेखा कोळेकर, कल्पनाताई घागरे आणि उपसभापती जगन्नाथ कोळेकर हे चारच पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. यापुढील काळात संजयकाका गटाचे प्राबल्य वाढणार, हे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी, घोरपडे गटासमोर आव्हानकवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजयकाका पाटील यांचा राजकीय वारु कवठेमहांकाळ तालुक्यात सुसाट धावू लागला आहे. तो रोखणे राष्ट्रवादी पक्ष व अजितराव घोरपडे गटाला मोठे आव्हान बनले आहे.
कवठेमहांकाळला काका गट सुसाट
By admin | Published: December 10, 2015 12:10 AM