मिरज : कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस आज शुक्रवारपासून सुरु होत आहे. सोलापूर-मिरज या सुपरफास्ट एक्स्प्रेसचा कलबुर्गी-कोल्हापूर असा विस्तार होऊन ही एक्स्प्रेस सुरु झाली आहे. यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रास जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे.
सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी व प्रवासी संघटनांनी सोलापूर - मिरज या सुपरफास्ट एक्स्प्रेसचा विस्तार करून कलबुर्गी-कोल्हापूर अशी गाडी सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. रेल्वे बोर्डाने यास २८ जुलै रोजी मंजुरी दिल्यानंतरही ही गाडी सुरू होण्यासाठी गेले दोन महिने प्रतीक्षा सुरू होती.
कोल्हापूर, मिरज, सोलापूर व येथील प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे दि. १६ सप्टेंबरपासून कलबुर्गी-कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू होत आहे. शुक्रवारी सकाळी कलबुर्गी स्थानकात केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या नवीन रेल्वेचे उद्घाटन होणार आहे.
कलबुर्गी येथून दररोज सकाळी ६.४० वाजता सुटणारी ही एक्स्प्रेस दुपारी १२.४० वाजता मिरजेत व २.१५ वाजता कोल्हापुरात पोहोचणार आहे. कोल्हापूर येथून दुपारी ३ वाजता निघून मिरजेत ४.३० वाजता व कलबुर्गी स्थानकात रात्री १०.४५ वाजता ही एक्स्प्रेस पोहोचेल. कोल्हापूर-कलबुर्गी गाडी सुरू झाल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रास जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. कलबुर्गी, सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर परिसरातून मिरजेत वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांनाही ही रेल्वे सोयीची होणार असल्याचे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व संदीप शिंदे यांनी सांगितले.