उमेश जाधव -- कामेरी -कामेरी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ फेररचनेनंतर आरक्षण जाहीर होताच, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. कामेरी जि. प. व पंचायत समितीच्या कामेरी व ऐतवडे बुदु्रक गणासाठीही सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने या मतदार संघात पाच वर्षात महिलाराज असणार आहे.कामेरी जि. प. मतदार संघात १३ गावांचा समावेश झाला आहे. यापैकी ११ गावांचा या मतदार संघात नव्याने समावेश झाला आहे. कामेरी व विठ्ठलवाडी ही दोनच गावे पूर्वीच्या मतदार संघातील आहेत. असे असले तरी निवडणूक कोणतीही असो, कामेरी गावचे मताधिक्य हा नेहमीच चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरलेला असतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जि. प. मतदार संघाची रचना नेहमीच बदलती ठेवून येथील स्थानिक राजकीय नेत्यांचे नेतृत्व संकुचित ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांकडून होत आला आहे. यावेळची मतदारसंघ पुनर्रचना याला अपवाद नाही.यापूर्वी २00२ मध्ये जि. प. मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. त्यावेळी सौ. छाया पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत उठावदार काम केले होते. २0१२ मध्ये राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस अशी लढत होती. राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यामुळे रणजित पाटील यांना विजय मिळाला होता. त्यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यामुळे दोघांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. यावेळीही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या भूमिकेवरच येथील लढतीचे भवितव्य ठरणार आहे.यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात लढत दिली होती. त्यावेळी सौ. राधादेवी निळकंठ व सौ. सुजाता मदने या काँग्रेस उमेदवारांनी जि. प. व पं. स.मध्ये विजय मिळवला होता. गतवेळी कामेरी जि. प. मतदार संघात समाविष्ट असणारे येडेनिपाणी हे मोठे गाव बावची जि. प. मतदार संघात गेल्यामुळे कामेरी जि. प. व पं. स. या दोन्ही जागेवर कामेरी गावच्याच महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार नाही.मतदारसंघ पुनर्रचना : ठरणार डोकेदुखीआजवर कामेरीतील नेते ठरवतील तोच उमेदवार येथून विजयी होत होता. मात्र नव्याने समावेश झालेल्या ऐतवडे बुद्रुक मतदार संघामुळे मंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, अभिजित पाटील यांचाही विचार राष्ट्रवादीविरोधी आघाडी तयार करताना करावा लागणार आहे. राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशी लढत झाल्यास ही निवडणूक चुरशीची होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी उमेदवारी दिल्यास यावेळी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. यापूर्वी कामेरी जि. प. मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.- सौ. छाया अनिल पाटील, माजी जि. प. सदस्या, कामेरी.
कामेरी जिल्हा परिषद गटात ‘महिलाराज’
By admin | Published: October 18, 2016 11:37 PM