अशोक पाटील - इस्लामपूर -कोणत्याही शुभकार्यात अक्षतांचे मोठे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षता टाकण्याची योग्य पध्दत आणि अक्षता दुरुन टाकल्यामुळे अप्रत्यक्षपणे होणारी अन्नाची (तांदळाची) नासाडी टाळणे हा सुध्दा आपल्या सामाजिक व्यवधान पाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. व्यक्तीपरत्वे मतभिन्नता असू शकते. ‘माणूस आस्तिक की नास्तिक’ अशा चर्चेच्या जंगलात न अडकता येथील उद्योजक सर्जेराव यादव यांनी आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी सर्रासपणे अक्षता वाटण्याच्या प्रथेला फाटा देऊन एक सामाजिक कर्तव्यभावना पालनाचा संदेशच दिला.येथील प्रसिध्द उद्योजक सर्जेराव यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी यादव यांनी या अभिनव प्रथेची आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यापासून सुरुवात केली. ‘आधी केले, मग सांगितले’ या संत वचनानुसार यादव दाम्पत्याने हा पुरोगामी विचार समाजासमोर ठेवला आहे. विवाहाकडे समारंभ नव्हे, तर धार्मिक विधी म्हणून पाहणे गरजेचे आहे. वधू-वरांनी एकमेकांच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक व्हावे, या हेतूने विवाह संस्कार केले जातात. याकडे लक्ष वेधून अक्षता वाहण्याच्या योग्य पध्दतीबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.अक्षता या सुख, समृध्दी, धन, धान्य, संतती यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या आशीर्वादपर स्पर्शाने वधू- वरांना या सर्वांचा लाभ होतो. दुरून टाकलेल्या अक्षता प्रत्यक्ष वधू-वरांच्या मस्तकावर न पडल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आशीर्वाद याचा वधू-वरांना लाभ होत नाही. अक्षतेला देवतेचेही रूप असते. अशा देवता स्वरूप मंगलाक्षता उपस्थितांच्या पायाखाली तुडवल्या जातात. पर्यायाने देवता आणि मंगल आशीर्वादाचा अवमान होतो. सामाजिक हित आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार करता अक्षता या नैसर्गिक रंगांचा वापर करूनच तयार केल्या पाहिजेत, असा विचार मांडून यादव दाम्पत्याने आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी विवाह संस्कारांचे मनस्वी पालन करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होेत होती.
अक्षतांचे महत्त्व जोपासत कन्यादान!
By admin | Published: December 16, 2014 10:32 PM