संख : करजगी (ता. जत) येथील बोर ओढ्यावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला सांगली पाटबंधारे विभागाकडून लोखंडी बरगे (प्लेट) बसविण्यात आल्या आहेत. ठेकेदाराला काम देण्यात आले होते. ठेकेदारांना बरगे व्यवस्थित बसविलेले नाहीत. आवश्यक साधनसामग्री न वापरल्याने पाणी दरवाज्यांतून वाहून जात आहे. रब्बी हंगामातील पिके, द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत येणार आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बंधाऱ्यांची अवस्था ''असून अडचण, नसून खोळंबा'' अशी झाली आहे.
पूर्वभागातील करजगी येथे गावालगत बोर नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा कृष्णा खोरे महामंडलांर्तगत २००३ मध्ये बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहेत. पाणीसाठा १६ दशलक्ष घनफूट आहे. एकूण ओलिताखाली येणारे क्षेत्र ५०० एकर आहे. हा बंधारा रब्बी हंगामातील पिके, द्राक्षे, डाळिंब फळबाग, ऊसपिकासाठी उपयुक्त आहे. या बंधाऱ्यातील पाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरते. बंधाराची दुरुस्ती, देखभाल पाटबंधारे विभागाची आहे. पाणी अडविण्यासाठी लोखंडी बरगे (प्लेट) दरवाजे बसविले आहेत. त्यामध्ये लोखंडी बरगे व्यवस्थित न बसविल्याने पाणीची गळती सुरू आहे. याअगोदर भागात दमदार पाऊस न झाल्याने पाणी गळतीचा प्रश्नच आला नाही.
यावर्षी पाटबंधारे विभागाने बरगे घालण्यासाठी कार्यालयीन ऑफलाईन टेंडर काढले होते. लोखंडी बरगे बसवून गंजू नये म्हणून गंजविरोधी रंग मारणे, काॅटन कापड, सिमेंट अपेक्षित होते पण काही बरग्यांनाच रंग मारला आहे. ठेकेदारांनी संगनमताने तोंडाला पाने पुसली आहेत. विभागाच्या दुर्लक्षाने काम निकृष्ट झाले आहे. लोखंडी दरवाजे व्यवस्थित न बसविल्याने या बंधाऱ्यातील पाणी गळती झाली आहे. सध्या बंधाऱ्यात १० टक्केच शिल्लक आहे.
फळबागांना नवसंजीवनी
गावातील द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे. फळबागेचे चांगले उत्पादन घेतले जाते. या बंधाऱ्याचा फायदा फळबागांना होणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा फळबागांना नवसंजीवनी ठरणार होता. बंधारा कोरडा पडल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन बंधारा दुरुस्तीचे काम परत करावे, अशी मागणी हाेत आहे.
फोटो : २९ संख १
ओळ : करजगी (ता. जत) येथील कोल्हापूर बंधाऱ्यात गळतीमुळे केवळ १० टक्के पाणी शिल्लक आहे.