सांगली : कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर ट्रस्टतर्फे कर्मवीर विद्याभूषण पुरस्काराने भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रा. शिवाजीराव कदम, कर्मवीर उद्योगभूषण पुरस्काराने मनोहर सारडा आणि कर्मवीर कृषिभूषण पुरस्काराने डॉ. संजीव माने यांचा गौरव होणार आहे, अशी माहिती कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष ए. के. चौगुले यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.पाटील व चौगुले म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी कर्मवीर भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. शनिवार, ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, माजीमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी असणार आहेत. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटणारे डॉ. प्रा. शिवाजीराव कदम यांचा विद्याभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे. उद्योजक आणि नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणारे मनोहर सारडा यांचा कर्मवीर उद्योगभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी डॉ. संजीव माने याचा कर्मवीर कृषिभूषण पुरस्काराने सन्मान होईल.यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यवाह लालासो थोटे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक सकळे, संचालक ॲड. एस. पी. मगदुम, डॉ. रमेश ढबू. वसंतराव नवले, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, संचालिका भारती चोपडे, तज्ज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम आदी उपस्थित होते.
रघुनाथ माशेलकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे शनिवार ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे-डिग्रज ता. मिरज येथे एक हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक प्राचार्य डी. डी. चौगुले यांनी केले आहे.