सुशांत घोरपडेम्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ हे सीमाभागातील मोठे गाव आहे. पण, येथे कर्नाटक महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्नाटकने प्रत्येक बस म्हैसाळमध्ये थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी हाेत आहे.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले मोठे गाव म्हणून म्हैसाळची ओळख आहे. येथून नरवाड, लक्ष्मीनगर, गायरानवाडीतील नागरिकांना प्रवास करावा लागतो. कर्नाटकातून या गावात यायचे झाल्यास म्हैसाळला उतरावे लागते. रिक्षा, सिटी बस, खासगी प्रवासी वाहन या माध्यमातून प्रवास करावा लागतो. मात्र कर्नाटकच्या काही बसेस म्हैसाळमध्ये थांबत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. काहीवेळा विनंती केल्यास बस थांबविली जाते. मात्र मिरजेपर्यंतचे तिकीट घेतले जाते.महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या कर्नाटकच्या बसेस मात्र म्हैसाळमध्ये थांबतात. कारण या थांब्यावर चढणारे सर्व प्रवासी कर्नाटकात प्रवास करणारे असतात. हा दुजाभाव का केला जातो, हा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. याबाबत प्रवाशांनी कर्नाटक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे तक्रार केली आहे.ग्रामसभेतही याविषयी ठराव झाले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. काही आगाराच्या कर्नाटक बसेस म्हैसाळला थांबतात. मात्र, काही आगाराच्या थांबत नाहीत. कर्नाटकातून महाराष्ट्र प्रवेश करणाऱ्या कर्नाटकच्या बसेसना म्हैसाळमध्ये थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.नाणी चालत नाहीतमहाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांची नाणी चालतात. मात्र, कर्नाटक बसेसमध्ये दहा रुपयांची नाणी घेतली जात नाहीत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
कर्नाटकच्या बसेस म्हैसाळला थांबेनात, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 5:00 PM