संतोष भिसेसांगली : कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन कर्नाटक सरकारने रोखून धरला आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा श्वास रोखला गेला आहे. विविध राज्यांना ऑक्सिजन वितरणाविषयी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजय रॉय यांनी बुधवारी आदेश जारी केले.दिल्लीत ऑक्सजनची आणिबाणी निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला वारंवार खडसावले आहे, त्यामुळेच महाराष्ट्राची नाकेबंदी करण्यात आल्याचे वृत्त आहे. सांगलीची दररोजची ऑक्सिजन मागणी ४० टनांपर्यंत आहे. पुणे, रायगडमधून तो यायचा. मागणी वाढल्यानंतर कर्नाटकातील बेल्लारी येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून येऊ लागला.
सध्या चोवीस तासांत दोन टँकरमधून २० ते २५ टन ऑक्सिजन येत होता. मागणीच्या तुलनेत कमी असला तरी त्यामुळे काहीसा दिलासा मिळत होता. आता हा पुरवठा थांबविण्याचे आदेश आले आहेत. या आदेशांची माहिती बुधवारी रात्री मिळाली. ऑक्सिजन थांबवण्यात आल्याचे वृत्त थडकल्यानंतर गोंधळ निर्माण झाला.या निर्णयाने थांबल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेल्लारीहून पुरवठा थाबंल्याचे समजताच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी दुपारी सांगलीतील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट दिली. उपलब्ध साठ्याची माहिती घेतली.जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या स्थितीत अचानक पुरवठा थांबल्याने प्रशासनही हवालदिल झाले आहे. सध्या बेल्लारीहून २४ तासांत २० ते २५ टन, पुणे व रायगडमधून १० टन आणि कोल्हापूरहून पाच टनांपर्यंत ऑक्सिजन मिळायचा. मागणीइतक्याच पुरवठ्यामुळे सर्वांचीच तारेवरची कसरत सुरु होती. बेल्लारीच्या २० टन पुरवठ्याला अचानक ब्रेक लागल्याने उर्वरीत १५-२० टनांवर रुग्ण जगवायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सांगलीचे शासकीय रुग्णालयदेखील कोल्हापुरातील पुरवठ्यावर अवलंबून आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात टंचाई्स्थिती आहे. बेल्लारीच्या बंद झालेल्या पुरवठ्यावर पर्याय शोधण्याची खटपट जिल्हा प्रशासनाकडून सुरु होती.महाराष्ट्राला प्राणवायू पुरवठ्यासाठी नवा प्लॅनआरोग्य संचालकांच्या नियोजनानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांना भिलाई, जामनगर, बेल्लारी, डोलवी, पुणे, कोल्हापूर, चाकण, बुटीबोरी (नागपूर), मुरबाड, तळोजा व ओरीसा येथून ऑक्सिजन मिळणार आहे.