सांगली : कोणत्याही राज्याने १५ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के धरणे भरू नयेत, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण, हा नियम पायदळी तुडवीत कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने धरणे जवळपास ८५ ते १०० टक्केपर्यंत भरली आहेत. बहुचर्चित अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून १२२.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तसेच कोयना ७९ टक्के तर वारणा धरणात ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची उंची ५१९.६० मीटर असून १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये १२२.४८ टीएमसी पाणी साठलेले आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी धरण सध्या शंभर टक्के भरले आहे, असे सांगितले. वास्तविक दि. १५ सप्टेंबरपर्यंत कोणतेही धरण १०० टक्के भरता येत नाही. पण, सर्व नियम पायदळी तुडवित कर्नाटक जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण १०० टक्के भरले आहे. याला महाराष्ट्राचा जलसंपदा विभागही अपवाद नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोयना ७९ टक्के तर वारणा ८६ टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीने अलमट्टीसह महाराष्ट्राची धरणे १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के भरू नयेत, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली होती. तरीही अलमट्टी धरण गुरुवारी १०० टक्के भरले असून धरणातून सध्या केवळ १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
केंद्रीय जल आयोगाचा नियमकेंद्रीय जल आयोगाने पावसाळ्यात धरणांमध्ये किती पाणीसाठा असावा, याचे नियम ठरविले आहेत. त्यानुसार दि. ३१ मे रोजी १० टक्के, दि. ३१ जुलैअखेर ५० टक्के, दि. ३१ ऑगस्ट ७७ टक्के आणि दि. १५ सप्टेंबरनंतर हवामानाचा अंदाज घेऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरावीत, असे धोरण ठरले आहे.