जत : जत तालुक्यातील तिकोंडी गावाने शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे फलक, तसेच कर्नाटकचा ध्वज फडकावीत पाणीप्रश्न न सुटल्यास कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शविली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी उमराणीतही सरपंच, उपसरपंचांसह गावकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्याचा ध्वज फडकाविला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू भूमिकेचा निषेध करण्यात आला.पाणीप्रश्नी सीमाभागातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. कर्नाटक राज्य महाराष्ट्राला खुले निमंत्रण देत असताना सीमा भागातील जनता डोळ्यांत तेल घालून महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. सीमाभागातील तिकोंडीपाठोपाठ उमराणीच्या ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीसमोर एकत्र येत महाराष्ट्र सरकारच्या भुमिकेचा निषेध केला. सरपंच विजयकुमार नामद, उपसरपंच संजय शिंदे, राष्ट्रवादीचे नेते राहुलसिंह डफळे, आप्पासाहेब देशमुख, महादेव राचगोंड, माधवराव डफळे, उत्तम शिंदे, चिक्कापा धोडमनी, संजय धोडमनी, आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.सरपंच विजयकुमार नामद म्हणाले, एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जत तालुक्यावर दावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाला येथील जनतेला काय वाटते, याची साधी विचारपूसही करावीशी वाटत नाही. शासनाचा एकही प्रतिनिधी इकडे फिरकला नाही. हीच सीमाभागातील जनतेबद्दल असणारी राज्य शासनाची सौहार्दता का?, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत म्हैसाळ योजनेचे टप्पे सांगून जत तालुक्यातील जनतेची मते घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, पण आता हे चालणार नाही. लवकरात लवकर आमचे प्रश्न साेडवा, अन्यथा आम्हाला कर्नाटकबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जतमधील तिकोंडीनंतर 'या' गावात लागले कर्नाटकचे ध्वज व फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:56 PM