संख : सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राला डिवचणाऱ्या कर्नाटकने बुधवारी पुन्हा कुरापत काढली. तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडून कर्नाटकने लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. यतनाळ येथील ओढापात्रातून सोडलेल्या या पाण्यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात तुडुंब भरून वाहू लागला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी जलसंपदामंत्री एम.बी. पाटील यांनी जतच्या ४० गावांवर दावा करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यासह महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त होतानाच पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवल्याने महाराष्ट्र सरकारबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.राज्य सरकार एकीकडे म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे, तर याचवेळी कर्नाटकने सीमाभागातील लोकभावनेला हात घालत थेट तुबची- बबलेश्वर योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर असलेला तिकोंडी तलाव गुरुवारी भरून वाहू लागला आहे.
कर्नाटकातून नैसर्गिक उताराने जतमध्ये पाणी येऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याचे दिसत आहे. जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावांवर दावा करणाऱ्या कर्नाटक शासनाचे तिकोंडी गावाने समर्थन केल्याने हे पाणी सोडून या परिसराला कर्नाटकात येण्याचे निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा सुरू असतानाच कुरापत काढलीसांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी गुरुवारी जत पूर्वभागाच्या दौऱ्यावर होते. म्हैसाळ योजनेच्या मायथळ कालव्यातून पूर्वभागातील वंचित गावांना पाणी देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण सहा तलावांची पाहणी केली. लोकांची मतेही जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा डिवचले आहे.