लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील ‘गज्या’ बैलाने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ‘जन्म बैलाचा, पण देह हत्तीचा’ असणाऱ्या गज्याला कृष्णा सायमोते यांनी घरच्या सदस्यासारखे सांभाळले होते.
कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास टनभर वजन असलेल्या गज्याला आपुलकीने पाळले होते. त्याचा खुराक मोठा होता. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील अनेक कृषी प्रदर्शनांत गज्याच्या अवाढव्य आकारमानाचे आकर्षण होते.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक वजनदार गटात गज्याची नोंद आहे. कृषी प्रदर्शनात गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याची अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे ‘जन्म बैलाचा, पण देह मात्र हत्तीचा’ अशी त्याची ओळख बनली होती. यामुळे गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची. कृष्णा सायमोते यांच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कसबे डिग्रजचे नाव देश पातळीवर पोहोचवणाऱ्या गज्याच्या अकाली जाण्याने बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.