कसबे डिग्रज : महापुराचा फटका गावातील पाणी योजनेला बसला असून, मोटारी बंद पडल्या आहेत. आपत्कालिन परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली अतिरिक्त ६० एचपीची मोटार दोन महिन्यांपासून गायब झाल्याची गंभीर बाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. याबाबत या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला धारेवर धरले.
कसबे डिग्रज नळपाणी योजनेला २० एचपीच्या मोटारीने पाणी पुरवठा सुरू असतो. एक ६० एचपीची मोटार आपत्कालिन वापरासाठी ठेवली होती. सध्या महापुरामुळे नियमित वापराच्या मोटारी पाण्यात बुडाल्याने बंद पडल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त मोटार सुरू करून पाणी द्यावे याकरिता काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उद्योजक बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच राजेंद्र जाधव, संतोष पिंपळे यांनी जॅकवेलला भेट दिली. यावेळी ही मोटार गायब झाल्याचे दिसून आले. काँग्रेस नेत्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येत याविषयीचा जाब विचारला. ही मोटार दुरुस्तीला दिली, कोणीतरी घेऊन गेले, दुसऱ्यांना वापरण्यास दिली आहे, अशी वेगवेगळे माहिती सरपंच व सदस्यांनी दिली.
त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्यापर्यंत मोटार उपलब्ध करून पाणी पुरवठा सुरू न केल्यास गावकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सरपंच किरण लोंढे, उपसरपंच सागर चव्हाण, संदीप निकम, माजी उपसरपंच प्रमोद चव्हाण, संजय शिंदे, अण्णा सायमोते, आरिफ खाटीक, अरुण पवार, ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर आदी उपस्थित होते.