सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील तलाव गेल्या ४६ वर्षांत प्रथमच आटले आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने खर्चाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तलाव पूर्णपणे आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांना पाणी बंद झाले आहे. जनवारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.कवलापूरचा तलाव प्रसिद्ध आहे. हा तलाव कधी आणि कोणी काढला, याबद्दल जुन्या लोकांनाही माहीत नाही. गावाबाहेर विमानतळालगत तलाव आहे. तो आकाराने खूप मोठा आहे. येथे नेहमीच महिलांची कपडे धुण्यासाठी गर्दी असते. जनवारांनाही पाणी पाजण्यासाठी आणले जाते. काहीजण वाहने धुवायला येतात. अगदी बुधगावचे ग्रामस्थ या तलावाचा उपयोग करुन घेतात. गणेश मूर्तींचे विसर्जनही केले जाते. घटस्थापना तसेच सिद्धेश्वर यात्रेपूर्वी मोठी धुणी धुण्यासाठी संपूर्ण गाव या तलावावर येते. मध्यंतरी तळ्यातील मासेमारीचा ठेकाही देण्यात आला होता. सांगलीपासून अवघ्या दहा किलोमीटरवर कवलापूर गाव आहे. तरीही कित्येक वर्षांपासून या गावचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकदा महिना, पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यावेळी ग्रामस्थांना या तलावाचा खूप आधार मिळतो. विशेषत: महिला कपडे धुण्यासाठी येतात. बहुतांश गावातील जनावरांना पाणी पाजण्यास आणले जाते.यावर्षी ऐन उन्हाळ्यात तलाव आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीकडून पाच ते सहा दिवसांतून एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे. नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. जनवारांना पाणी खूप लागते. यासाठी तलावाचा आधार होतो. मात्र गेल्या ४५ वर्षांत यंदा तो प्रथमच आटला आहे. १९७२ ला दुष्काळ पडला होता. त्यावेळीही तलाव आटला होता. दुष्काळी परिस्थितीत याच तलावाने ग्रामस्थांना तारले होते. ग्रामस्थांनी गाळही काढला होता. तलाव, विहीर आणि कूपनलिका असे एक आगळे-वेगळे समीकरण आहे. तलाव आटले की, परिसरातील विहिरी तळ गाठतात. कूपनलिकांना अजिबात पाणी येत नाही. धुळगाव रस्त्यावर पिराचा मळा येथे एक खूप खोल विहीर आहे. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले, तर या विहिरीतील पाणीही कमी होत असे. आताही तशीच परिस्थिती आहे. दरम्यान ग्रामस्थ शरद पाटील यांनी तलावातील गाळ काढण्याची तयारी दर्शविली आहे.
कवलापुरातील तलाव ४६ वर्षांत प्रथमच आटला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:09 PM